नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म 'बझफ्लिक्स' ची दणक्यात सुरूवात

 नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म 'बझफ्लिक्स' ची दणक्यात सुरूवात,

३ नव्या वेबसिरीज आणि १०० चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध

कुटुंबासह पाहता येतील अशा मालिका आणि चित्रपट 'बझफ्लिक्स'वर पाहता येणार

 प्रतिनिधी,

मुंबई-    देशातील आगळावेगळा आणि नवा कोरा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेला बझफ्लिक्स (Buzzflix) प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील मालिका, चित्रपट हे संपूर्ण कुटुंबासह पाहता येतील.  दिमाखदारपणे बझफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्धाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टी तसंच मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. 


निर्माता आणि दिग्दर्शक आनंद पंडित, फॅशन डिझायनर अर्चना कोचर, अभिनेत्री मौली गांगुली, मराठी अभिनेता विजय पाटकर, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अभिनेता कंवलजीत पेंटल, रोडीजची विजेती आणि अभिनेत्री श्वेता मेहता आणि हास्यकलाकार सुनील पाल यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. 

बझफ्लिक्सवर मराठी अभिनेते विजय पाटकर यांची भूमिका असलेली शांताराम VS मेनी ( Shantaram VS Many) ही वेबसिरीज लाँच करण्यात आली आहे. बझफ्लिक्सच्या लाँचिंग सोहळ्याला हजर असलेले पाटकर म्हणाले की, "बझफ्लिक्सची खासियत ही आहे की,  इथे कौटुंबिक मनोरंजनाची हमी मिळते." बझफ्लिक्समुळे मला चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसिद्ध हास्यकलाकार सुनील पाल याने म्हटले की, "माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सकस आणि निखळ मनोरंजन देणाऱ्या बाबी निवडाव्यात. मला खात्री आहे की बझफ्लिक्सवर 'कॉमेडी शो' देखील असेल."


बझफ्लिक्सच्या लाँचिंग सोहळ्यात ३ नव्याकोऱ्या वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आल्या. यामध्ये  शांताराम VS मेनी, एक अनसुनी धुन - नॉट रिचेबल, आणि नट्टू की अलमारी यांचा समावेश आहे. या तीन वेबसिरीज व्यतिरिक्त १०० चित्रपट बझफ्लिक्सवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात आगामी वेबसिरीज ०.०० मेगावॅट-चंदनपूर आणि विष्णू की वेस्पा या वेबसिरीजची झलकही दाखवण्यात आली. 

#sabkaott  या हॅशटॅग अंतर्गत या ओटीटी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट तसेच मालिका कुटुंबासह पाहता येतील. त्यामुळे हा ओटीटी प्लॅटफॉर्म सद्यस्थितीतील इतर प्लॅटफॉर्म पेक्षा सर्वार्थाने वेगळा असणार आहे. अश्लीलता, हिंस्र , उत्तान बाबी बझफ्लिक्सवर दाखवल्या जाणार नाहीत. 

बझफ्लिक्सचे संस्थापक समीर शेणॉय, सहसंस्थापक राकेश ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवरसेन येसंबरे यांनी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत माहिती देताना सांगितले की, "बझफ्लिक्स वरील चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद कुटुंबासह लुटता येईल. तरुणांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म लोकप्रिय झाल्याने याची प्रेक्षक संख्या वाढली आहे. मात्र सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या यादीत एकही प्लॅटफॉर्म असा नाही, ज्यावरील मालिका किंवा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह आपण घरी बसून पाहू शकतो. आम्ही इतरांशी स्पर्धा करू इच्छित नाही, मात्र प्रेक्षकांना एक चांगला पर्याय म्हणून बझफ्लिक्सवर वैविध्यपूर्ण आणि चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील." 

शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक वर्ग कुटुंबस्नेही मालिका आणि चित्रपट पाहणं पसंत करतो. बझफ्लिक्सने हाच प्रेक्षक आपला लक्षित ग्राहक म्हणून धरला आहे. या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट हा तूर्तास हिंदी भाषेत असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांत डब केला जाणार आहे. प्रादेशिक भाषेतील कंटेंट वाढवण्यावर या पुढील काळात भर दिला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही