अर्धे रेशन कीट देण्यास रेशन दुकानदारांचा विरोध

 

अर्धे रेशन कीट देण्यास रेशन दुकानदारांचा विरोध

 प्रतिनिधी 

मुंबई – दिवाळी संपली तरी राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अनेक नागरिकांर्यंत पोचला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.  

काही ठिकाणी साखर १ किलो, १ किलो चणाडाळ, १ किलो रवा व १ लिटर गोडे तेल या वस्तुंचा समावेश असलेले कीट वाटप करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी शिधा कीट मधील काही वस्तू  अद्याप पोहोचले नसल्याने ज्या वस्तू आल्या आहेत त्या वाटप करण्याचे तोंडी आदेश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र अर्धवट कीट देण्यास रेशन दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे.

 

मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रेशन दुकानदारांना सरकारच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत रविवारी देखील रेशन वाटप करण्यासाठी दुकाने उघडी ठेवावी लागली. मात्र सर्व कीट उपलब्ध न झाल्याने अद्याप सर्वांना हे कीट देणे शक्य झाले नाही. आता अर्धवट कीट देण्यावरुन ग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. रेशन दुकानदारांनी अर्धे कीट वाटप करु नये, असे आवाहन नवीन मारु यांनी रेशन दुकानदारांना केले आहे.

 

रेशन दुकानदारांची दिवाळी खराब करुन सरकार व कंत्राटदारांची दिवाळी जोरात असल्याचा सूर रेशन दुकानदारांमधून व्यक्त केला जात आहे. सरकारने योजना आखताना पुरेशी तयारी करण्याची गरज होती असे मत दुकानदार व ग्राहक व्यक्त करत आहेत. सरकारने श्रेय घेतले मात्र  अंमलबजावणी करताना जबाबदारी रेशन दुकानदारांवर ढकलली व त्यातही कीट वेळेवर उपलब्ध करुन देण्यात सरकार- प्रशासन अयशस्वी ठरल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब