वक्फ बोर्डाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात हाजी अरफात शेख आक्रमक, अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  

वक्फ बोर्डाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात हाजी अरफात शेख आक्रमक,

अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारची दिशाभूल करणाऱ्या जयश्री मुखर्जी यांच्यावर कारवाईची मागणी

बेकायदा नेमणूक रोखली

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई -  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे भ्रष्ट व वादग्रस्त अधिकारी अनीस शेख व फारुख प़ठाण यांची बेकायदा होत असलेली नेमणूक त्वरित थांबवावी व सरकारची दिशाभूल करणाऱ्या सनदी अधिकारी जयश्री मुखर्जी यांच्यावर कडक कारवाई करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष, भाजपच्या वाहतूक विभागाचे प्रमुख हाजी अरफात शेख आक्रमक झाले आहेत. याबाबत, हाजी अरफात शेख यांनी भोपाळ दौऱ्यावरुन थेट दिल्ली गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली व कारवाईची मागणी केली. शेख यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शेख व पठाण यांची नेमणूक रोखल्याची माहिती हाजी अरफात यांनी दिली.


 

महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री असताना मुखर्जी यांनी शेख व पठाण या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी केले. मलिक व मुखर्जी यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सरकारची व अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली. मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या पुण्यातील प्रकरणात ३ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याच्या प्रकरणात अनिस शेख व फारुख पठाण यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे, याबाबत हाजी अरफात शेख यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

सनदी अधिकारी असलेल्या जयश्री मुखर्जी ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत, मात्र निवृत्तीपूर्वी अनिस शेख या अधिकाऱ्याला औरंगाबाद येथील वक्फ न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याची माहिती मिळताच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भोपाळ दौऱ्यावर असलेले हाजी अरफात शेख हे तातडीने  दिल्लीला पोचले व त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वक्फ बोर्ड व अल्पसंख्याक विभागात झालेल्या अनागोंदीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 

नवाब मलिक यांनी मंत्रीपदाच्या काळात केलेल्या अनेक वादग्रस्त प्रकरणांमधील पुरावे नष्ट करण्यासाठी मुखर्जी प्रयत्नशील असल्याचा आरोप शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. सीईओ पदी तात्पुरती नेमणूक केलेल्या जुनेद सय्यद यांची तडकाफडकी बदली करुन नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या प्रकाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे, असे शेख यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.  

 

जयश्री मुखर्जी यांनी मनमानी पध्दतीने केलेल्या कामांना स्थगिती देऊन चौकशी करावी, वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची भूमिका असलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्याला पूर्णवेळ नेमावे, भ्रष्ट व बेकायदा व्यवहार, कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्यायाला दूर करावे अशी मागणी हाजी अरफात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

 

या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेत जयश्री मुखर्जी, अनिस शेख व फारुख पठाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागणीची दखल घेतली असून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्पर असल्याचे हाजी अरफात शेख म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही