शाळकरी मुलीशी वाहकाचा दुर्व्यवहार, शमीम खान यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चौकशी समिती गठीत

शाळकरी मुलीशी वाहकाचा दुर्व्यवहार, शमीम खान यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चौकशी समिती गठीत
लोकमानस प्रतिनिधी
ठाणे - भास्कर नगर येथून शाळकरी मुलींसाठी सुरू केलेल्या टीएमटी बसगाडीतील पुरूष वाहकाने एका मुलीशी दुर्व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, परिवहन प्रशासनाने केवळ बदली करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने परिवहन सदस्य शमीम खान यांनी आक्रमण पवित्रा धारण केला. अखेरीस परिवहन सभापती विलास जोशी यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अहवालानंतर या वाहकावर कारवाई करण्यात येईल. 
गेल्या आठवड्यात एका हायस्कूलमधील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न टीएमटी वाहकाने केला होता. या प्रकरणाबद्दल  परिवहन समितीच्या बैठकीत शमीम खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 
या संदर्भात शमीम खान यांनी सांगितले की, परिवहन सभापती विलास जोशी यांचे आपण नेहमीच आभारी आहोत. कारण, त्यांच्यासमोर आम्ही जेव्हा जेव्हा कळवा, मुंब्रा भागातील परिवहन सेवेसंदर्भात त्रुटी मांडल्या तेव्हा तेव्हा त्यांनी त्या सोडविल्या आहेत. मात्र, अंजुमन खेरूल गर्ल हायस्कूल साठी कळवा पूर्वेकडून टीएमटीची बससेवा सुरू करण्याची आपण मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगानेच येथे बससेवा सुरू केली आहे. या बसमध्ये महिला कंडक्टर ठेवणे अपेक्षित असतानाही मुलींसाठी सुरू केलेल्या या बसगाडीतील पुरूष कंडक्टरने एका मुलीशी दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला आहे. या कंडक्टरला निलंबित करण्याची गरज असतानाही त्याची केवळ बदली करण्यात आली आहे. या विरोधात आपण सभागृहात आवाज उठवल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर सदर वाहकाला निलंबित करण्यात येणार आहे, असे शमीम खान यांनी सांगितले. 
दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानक ते दत्तमंदिर कल्याण फाटा दरम्यान बससेवा सुरू करावी, मुंब्रा स्टेशन ते माजीवडा दरम्यान धावणाऱ्या बससेवेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी आदी मागण्या या बैठकीत शमीम खान यांनी केल्या. या मागण्यांबाबत परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे , असेही खान यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही