भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते -मुख्यमंत्रीपांडुरंग फुंडकर यांच्यावरील 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते -मुख्यमंत्री
पांडुरंग फुंडकर यांच्यावरील 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन
लोकमानस प्रतिनिधी 
          मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत लढणारे आणि शेतकरी बांधवांच्याप्रती आस्था असणारे दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर राज्यातील शेतकरी कुटुंबांचे ‘भूमिपुत्र’ होते. शेतमालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सावकारी कर्जाला आळा बसावा, ग्रामीण भागात सहकार चळवळीचे जाळे उभे रहावे या विषयांवर कार्य करुन विधिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. माती आणि सामान्य जनतेशी ज्यांची नाळ जोडली जाते तोच खरा ‘भूमिपुत्र’ असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          राज्याचे दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर यांचे जीवनकार्य, त्यांच्या विधिमंडळ व संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित 'भूमिपुत्र' या ग्रंथाचे प्रकाशन विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

          यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी राज्यपाल राम नाईक, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, दिवंगत फुंडकर यांचे चिरंजीव व विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, सागर फुंडकर, पत्नी सुनीताताई फुंडकर, भूमिपुत्र स्मृतीग्रंथाचे संपादक सुधीर पाठक उपस्थित होते.

          मुख्यमंत्री  म्हणाले, एखाद्या व्यक्तीमत्त्वावर स्मृतिग्रंथ प्रकाशित होणे हे सहजासहजी होत नाही. तसे त्या व्यक्तीचे कार्य पाहिजे. भाऊसाहेब हे स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता सतत शेतकरी हितासाठी लढणारे कार्यकर्ते होते, तसेच कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यावर आधारित प्रकाशित झालेल्या ‘भूमिपुत्र’ या स्मृतिग्रंथातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

          विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले, समाजासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सतत कार्य केले. दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा शोक प्रस्ताव विधानमंडळात मांडत असताना तत्कालीन अध्यक्षांनी त्यांच्या कार्यावर स्मृतिग्रंथ प्रकाशित व्हावा असे सांगितले होते. त्यानुसार हा स्मृतिग्रंथ विधानमंडळातील वि.स.पागे प्रशिक्षण केंद्राकडून संपादित करण्यात आला. भाऊसाहेब यांना कृषी क्षेत्राची आवड आणि शेतीचा छंद होता. ऑस्ट्रेलिया येथे अभ्यास दौऱ्यावर सोबत गेलो होतो. त्यावेळी त्यांनी शहरांमध्ये कधी पर्यटन केले नाही. ते शेतीविषयक पर्यटनाला प्राधान्य देत. त्यांनी संसदीय कार्यकाळात अनेक सदस्यांना मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये बोलताना एखाद्या सदस्याचे काही चुकले तर त्यात सुधारणा करा आणि चांगलं बोलले तर अभिनंदन म्हणून चिठ्ठी पाठवून आठवणीने सांगायचे. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरविण्यात आले होते. नवीन सदस्यांना सुद्धा त्यांच्या कार्याची माहिती या स्मृतिग्रथांतून होईल, असेही  नार्वेकर यांनी सांगितले.

भाऊसाहेब फुंडकर सेवावृत्तीचे सच्चे समाजसेवक - उपमुख्यमंत्री 

          भाऊसाहेब फुंडकर यांनी सातत्याने शेतकरी म्हणून काळ्या मातीची आणि नेता म्हणून भारत मातेची सेवा केली. ते सेवावृत्तीचे होते. समाजसेवक भाऊसाहेबांचे कार्य हे क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांचे वर्णन जसे 'ही स्टुड लाईक वॉल' असे केले जाते, तसे भाऊसाहेब शेतकऱ्यांसाठी राजकारणामध्ये भिंती सारखे भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्या कार्यात सातत्य होते, सर्वांना सोबत घेऊन, लोकांना संघटित करुन लोकांच्या व्यथा व वेदना समजून घेऊन काम करणारे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. शेतकऱ्यांकरिता संघर्ष करत अवैध सावकारीच्या विरुद्ध त्यांनी मोठा लढा उभारला. ‘शेतकऱ्यांचा मुलगा ते कृषीमंत्री’ हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी राहीला. खामगांव ते आमगांव ही पदयात्रा शेतकऱ्यांच्या हितासाठी सफलदायी ठरली. शेतकरी नेता म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली. राजकारण आणि व्यक्तीगत संबंध यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.

          एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर शेतकरी हितासाठी तळागाळातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व कार्यक्रम आखले. हे कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्यकर्तुत्वासंदर्भातील हा ग्रंथ आपण सामान्य माणसापर्यंत पोहचवू, असेही फडणवीस यांनी सांगितले.

          माजी राज्यपाल राम नाईक म्हणाले, दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा प्रवास राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता राजकीय पक्षाचे अध्यक्ष असा झाला. ते मनमिळावू नेते होते. समाजातील सर्व घटकांशी समन्वय ठेवून विचारविनिमय करुन समन्वयाने कार्य करत होते. त्यांच्या कार्याला मर्यादा नव्हती. ते सतत सामाजिक कार्यात गुंतलेले असायचे. अनेक वेळा त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला, असे सांगून नाईक यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

          उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भाऊसाहेब यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा यावर सतत प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. ते उत्कृष्ट संसदपटू होते. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले. अनेक सदस्यांना ते मार्गदर्शन करायचे. संसदीय कार्य समजून सांगायचे. संयमी असे त्यांचे नेतृत्व होते.

          विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत सभागृहामध्ये अनेक विषयांवर मतभेद होत असे परंतु त्यांनी कधीही मनभेद केला नाही. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि विश्वास होता. राजकीय वारसा नसताना त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यावर स्मृतिग्रंथ प्रकाशित करत असताना भूमिपूत्र नाव देऊन त्यांच्या कार्याला न्याय देण्यात आला आहे. नव्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे कार्य त्यांनी केले आहे.

          विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सर्व राजकीय पक्षांमध्ये दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा आदर आणि सन्मान होता. शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक प्रश्न सभागृहात मांडले. संघटना, विधीमंडळ आणि जनतेमध्ये समन्वय ठेवून त्यांनी कार्य केले. खामगांव येथे टेक्सटाईल पार्क उभा रहावा असे त्यांचे स्वप्न होते ते पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही  दानवे यांनी सांगितले.     

          या कार्यक्रमासाठी मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही