कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची इमारत पडण्याची घटना दुर्दैवी



कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची इमारत पडण्याची घटना दुर्दैवी 
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल विभाग' कार्यक्षेत्रातील कुर्ला परिसरात असणारी 'नाईक नगर सहकारी संस्था'ची इमारत' कोसळल्याची दुर्देवी घटना २७ जून २०२२ रोजी रात्री उशीरा घडली. या घटनेमध्ये १४ व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमी व्यक्तिंपैकी ९ व्यक्तिंवर आवश्यक ते उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात व शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात अनुक्रमे ३ व १ जखमी व्यक्तिंवर उपचार सुरु आहेत. तसेच या अनुषंगाने सदर इमारतीच्या परिसरात मदत व बचाव कार्य अव्याहतपणे सुरु आहे.  

या घटनेबाबत व सदर इमारतीबाबत महत्त्वाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दि. २७ जून २०२२ रोजी रात्री ११.५२ वा. या दुर्देवी घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त झाली. त्यानंतर लगेचच बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, 'एल' विभाग कार्यालयातील संबंधित आणि मुंबई पोलीस दल यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

 या अनुषंगाने एल विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले असता नाईक नगर सहकारी संस्थेच्या इमारतीची 'डी विंग' ही पूर्णतः ढासळली असल्याचे निदर्शनास आले.

 सदर इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर सन १९७३ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये ए, बी, सी व डी अशा ४ 'विंग' असून यापैकी पहिल्या तीन 'विंग' या ५ मजली (४ + तळ मजला) आहेत. तर 'डी' विंग ही ४ मजली (३ + तळ मजला) आहे.

सन २०१३ मध्ये २८ जून रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ३५४ नुसार सदर इमारतीला मोठ्या दुरुस्ती कामांची (Major Repairs)  करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. 

तथापि, सदर इमारतीमध्ये अपेक्षित दुरुस्ती कामे सदस्यांद्वारे करण्यात आली नाहीत. परिणामी सदर इमारतीवर कलम '४७५ ए' नुसार कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.

 दुरुस्ती कामे न करण्यात आल्याने सदर इमारतीचा समावेश 'सी १' या या प्रवर्गात करण्यात आला. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम ३५४ नुसार नोटीस जारी करण्यात आली. यानुसार दि. १८ नोव्हेंबर २०१४ आणि २६ मे २०१५ रोजी 'नाईक नगर सोसायटी' इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली. त्यानंतर १६ मे २०१६ रोजी इमारतीची जल व विद्युत जोडणी तोडण्यात आली होती. 

तथापि, मे. सचदेव आणि असोसिएट्स यांच्याद्वारे करण्यात आलेल्या 'स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट'नुसार दि. ३० जून २०१६ नुसार सदर इमारत 'सी २ बी' या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली. ज्यानंतर सदर इमारतीची जल विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात आली होती.

सदर इमारतीतील रहिवाशांनी सादर केलेल्या पत्रानुसार (अंडरटेकिंग) नमूद करण्यात आले आहे की, "संबंधित इमारतीत राहणारे सदस्य हे त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर सदर इमारतीमध्ये राहत असून कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सदर घटनेला बृहन्मुंबई महानगरपालिका जबाबदार नसेल. तर त्या घटनेची सर्व जबाबदारी ही संबंधित सदस्यांची असेल. तसेच सदर इमारतीमध्ये 'स्ट्रक्चरल रिपेअर्स' करण्यात आले नव्हते, असेही कळते.

सदर इमारतीच्या परिसरात मदत व बचाव कार्य आणि मलबा काढण्याची कार्यवाही
अव्याहतपणे सुरु आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही