मानसी घाडीची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी
मानसी घाडीची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी -
डॉ. शरीफ गिरकर, मोंड
+919370850967/ 09404449539
::::::::
(९ ऑक्टोबर २०२३ )
- मोंड गावात आज एक अतिशय दुख:द बातमी कानावर आली. लक्ष्मी मेडिकलची मालकीण व सर्वांची लाडकी मानसी वहिनी आम्हा सर्वांना सोडून सर्वांना दुःखाच्या खाईत लोटून ईश्वरचरणी विलीन झाली. बातमी अगदी अनपेक्षित तसेच ह्रद्याचा ठोका चुकवणारी होती. या बातमीने एका उदयोन्मुख पर्वाचा अंत झाला.
आपणा सर्वांना माहितच आहे की, तिच्या पतीचे असेच अचानक निधन झाले होते. ते वर्ष होते 2016. तिचा पती श्री. महेश घाडी (बंड्या) हा एक परोपरकारी व्यावसायिक होता. मेडिकल दुकान उघडल्यापासून त्याने पंचक्रोशीच्या जनतेची अहोरात्र निष्ठेने सेवा केली. रात्री अपरात्री औषधासाठी आलेला प्रत्येक माणूस औषध घेऊनच घरी जायचा. औषधाच्या पैशांसाठी त्याने रुग्णांची कधी अडवणूक केली नाही. अशा प्रकारे त्याचे अचानक जाणे सर्वांनाच एक मानसिक धक्का होता. मुले लहान, घरात मोठे असे दुसरे कोणी नाही, या परिस्थितीत त्या माऊलीने त्या प्रसंगाला कसे तोंड दिले ते त्या विधात्यालाच माहित. मुलांचे शिक्षण, व्यवसायात अचानक आलेली पोकळी, घर संसार बाग बागायती, सर्वच प्रश्न एकाच वेळी आ वासून उभे राहिले. अशा वेळी धैर्यवान पुरुषही गडबडतो परंतू त्या ही परिस्थितीत त्या माऊलीने धैर्याने त्या प्रसंगाला तोंड दिले.
पतीचे धार्मिक विधी झाल्यावर औषध दुकानाच्या तिने व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. डी फार्म झालेली एक व्यक्ती दुकानात ठेवून व्यवसाय पूर्ववत सुरु केला आणि विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन दोन्ही मुलांना इंजिनायरींगचे शिक्षण दिले व कलमांच्या बागेची देखील योग्य ती निगा राखली. दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा स्वतः डी फार्मसीचा कोर्स पूर्ण करण्याचा तिने निर्णय घेतला. पण खरी अडचण शिक्षणाची होती. ती वाणिज्य पदवीधर होती व डी फार्म साठी सायन्स अत्यावश्यक होते. तिने बारावी सायन्स बाहेरुन बसून ती त्यात उत्तीर्ण झाली व त्यानंतर तिने डी फार्मचा कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मेडिकल स्टोअरची धुरा तिने पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली आणि मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून आपल्या पतीप्रमाणे गोरगरीब जनतेची विनम्रपणे सेवा करु लागली.
दिवसांमागून दिवस जात होते, व्यवसाय, घर, संसार मुलांचे शिक्षण व नोकरी या गोष्टी पूर्णत्वास जात असतानाच आठ दिवसांच्या साध्या दिसणाऱ्या व्हायरलच्या साथीने उग्र रुप धारण केले. न्युमोनिया व प्रचंड अशक्तपणा या दोन कारणांमुळे या तपस्वी मातेने, सात्विक, सत्वशील अशा एका समाजसेविकेने नियतीशी दोन हात करता करता आपला देह ईश्वरचरणी समर्पित केला. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. कुणालाही तो चुकलेला नाही परंतू सुखाचा संसार अर्धवट सोडून अनपेक्षितपणे निघून जाणे ही खरी शोकांकिका आहे. दोन्ही मुले आता आईवडिलांविना पोरकी झाली आहेत. त्याचेच राहून राहून दु:ख वाटते व डोळ्यांच्या कडा पाणावतात. मनात रुंजी घालणाऱ्या विचारांना वाट मोकळी करुन देऊन त्या माऊलीला श्रध्दांजली वाहणे हेच आपल्या हातात उरले आहे, आणि काय?
तिच्या मुलांना व कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा